शासनाच्या जिवंत सातबारा नोंद मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारस नोंदींची प्रक्रिया पूर्ण करा-प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने
तुळापूर (ता.हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानदिनानिमित महसुल विभागाच्या माध्यमातून जिवंत सातबारा मोहीमेचा शुभारंभ

पुणे : महाराष्ट्र शासनामार्फत महसूल विभागाकडून १०० दिवस कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जिवंत सातबारा मोहीमेअंतर्गत सातबाराच्या नोंदी करुन आपला सातबारा जिवंत करावा, असे आवाहन हवेलीचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले.
शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून जिवंत सातबारा नोंदी राबविण्याची मोहीम शासनाने १ एप्रिलपासून हाती घेतली असून ज्या सातबारावर मृत व्यक्तींची नावे आहेत, त्यांच्या वारसांकडून कागदपत्रे घेऊन वारसनोंदी करण्याची मोहीम शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुर्वहवेलीत तुळापूर (ता.हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानदिनानिमित महसुल विभागाच्या माध्यमातून जिवंत सातबारा मोहीमेचा शुभारंभ प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार तृप्ती कोलते पाटील, गटविकास अधिकारी भूषण जोशी तसेच मंडल अधिकारी संदिप झिंगाडे, पेरणेचे ग्राममहसूल अधिकारी संजय शितोळे, तुळापूरचे ग्राम महसूल अधिकारी मारुती पवार तसेच स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत अनेक जुन्या मयत वारसनोंदही करण्यात आल्या असून त्यामध्ये १९७८ मधील एका जुन्या नोंदींचाही समावेश होता. पेरणे व तुळापुर येथे सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदींची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वारसा संदर्भात कागदपत्रे, मृत्यूदाखला, प्रतिज्ञापत्र, अर्ज, जबाब, पंचनामा, स्वयंघोषणापत्र व आधारकार्ड, रहिवासी पुराव्याबाबत सर्व कागदपत्रे ग्राममहसूल अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन मंडल अधिकारी संदिप झिंगाडे यांनी केले आहे.