कुशल आणि उपक्रमशील मनुष्यबळासाठी ‘डीपेक्स’ उपयुक्त

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे गौरवोद्गार

देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन – शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी

पुणे : जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता डीपेक्सच्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. देशात तंत्रज्ञानासह संशोधनाला प्रोत्साहन दिले जात असल्याची भावना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केली.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, सीईओपी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डीपेक्स-२०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. जी. सतीश रेड्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील भिरुड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनावणे, सृजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ आदी उपस्थित होते. 

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘डीपेक्स’ प्रदर्शनाची सुरुवात सांगली येथून १९८६ साली झाली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध कौशल्याधिष्ठीत गुणवंत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन मिळत असून  विविध क्षेत्रात या कल्पना मॉडेल स्वरुपात विकसित होत समाजातील गरजा पूर्ण करण्याचे काम होत आहे. 

देशात सर्वत्र संशोधनात्मक वातावरण असून नवोन्मेषक ‘स्टार्टअप’ उभारत आहेत. या स्टार्टअपमधून तयार होणाऱ्या नवनवीन संशोधनाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. जागतिक पातळीवर संरक्षण क्षेत्रात लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात देशात निर्माण होत असल्याने भारताला संरक्षण सामग्रीच्या निर्यातीची मोठी संधी आहे. डीपेक्स प्रदर्शन उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

डॉ. जी. सतीश रेड्डी म्हणाले, देशात आयआयटी, विद्यापीठ, महाविद्यालयात संशोधन आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात येत आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांचा नवकल्पनांना चालना मिळत आहे. आपल्या नवकल्पनाची जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल, देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल, या गोष्टीचा विचार करुन प्रचंड मेहनत करा, सन २०४७ मध्ये भारत देश जगाचे नेतृत्व करेल यादृष्टीने विकसित भारत करण्याची जबाबदारी तरूण पिढीवर आहे. जगाकरीता निर्मिती संकल्पना डोळ्यासमोर। ठेवून काम करावे, असे आवाहन श्री. रेड्डी यांनी केले. 

कृत्रिम बुद्धिमत्तेला डीपेक्समध्ये स्थान देणे गरजेचे आहे. डीपेक्सच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सूचनांची नोंद घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनात त्यांचा समावेश करावा, असे डॉ. भिरुड म्हणाले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, संकल्प फळदेसाई, डॉ. शांतीनाथ बागेवाडी, अथर्व कुलकर्णी, प्रसेनजीत फडणवीस, उद्योजक प्रकाश धोका यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button