महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र तुळापुर येथे संगमेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
नागरमल खंडोबा देवाच्या पालखी मिरवणुकीत ग्रामप्रदक्षिणेदरम्यान भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ
पुणे : महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र तुळापुर येथे आज दिवसभर संगमेश्वर मंदिर तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळी असंख्य भाविकांनी रांगा लावून संगमेश्वराचे दर्शन घेत शंभूराजांना अभिवादन केले.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे तुळापुर येथे त्रिवेणीसंगमावर शंभुराजे स्मृतीस्थळ परिसरात पुरातन संगमेश्वर मंदिरात मोठया संख्येने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.

पहाटे ग्रामस्थांच्या वतीने रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा व जिल्हापरिषद सदस्या सौ.स्वाती दत्तात्रय पाचुंदकर व उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर यांच्या हस्ते पूजाभिषेक करण्यात आला. यावेळी उद्योजक खंडू रामदास शिवले, माजी सरपंच संतोष शिवले, मयूरकाका पोळ उपस्थित होते.
भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी ग्रामस्थ, आयोजकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली. यावर्षी भाविकांच्या गर्दीतही वाढ झाली असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी जय भोले फौंडेशनच्या वतीने दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यानिमित्ताने आयोजित अखंड हरीनाम सप्ताहात दररोज कीर्तन,भजन व हरिनामाचा जपही सुरू आहे.
तर महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामस्थ व पुजारी यांनी एकत्र येऊन नागरमल खंडोबा देवाची पालखी मिरवणुकीने तुळापूर गावात प्रदक्षिणा घालून त्रिवेणी संगमावर स्नानासाठी आणल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे श्रीक्षेत्र तुळापूर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन पुजारी यांनी सांगितले.
————