संत तुकाराम महाराज शासकिय आयटीआय, हवेली मध्ये यशस्वी उद्योजकासह गुणवंत प्रशिक्षणार्थींचा गौरव
आयटीआय हा करिअरचा चांगला पर्याय असल्याचे मत मान्यवरांनी केले व्यक्त

पुणे : पेरणेफाटा (ता. हवेली) येथे संत तुकाराम महाराज शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमात उद्योजकता प्रशिक्षण घेवून व्यवसाय सुरु केलेल्या यशस्वी उद्योजकांसह विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत युवा प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला.
प्रबोधन केंद्र व स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष उत्तमराव भोंडवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरदराव पाबळे, डोंगरगावचे माजी सरपंच शामराव शिंदे, कल्याणी फोर्जचे युनिट हेड प्रविण पाटील, एच.आर. मॅनेजर किरण शिंदे, संस्थेचे प्राचार्य एस. एल. गोसावी, टि. एम. जाधव आदी मान्यवरांनी स्वानुभव कथन करीत प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. तर प्रशिक्षणार्थीनीही मनोगते व्यक्त केली. यामध्ये अत्यंत अल्प खर्चात मिळणाऱ्या आयटीआय प्रशिक्षणानंतर लगेच नोकरी अथवा स्वयंरोजगाराची संधी तसेच इच्छुकांना इंजिनिअरिंगसह उच्च शिक्षणाचे बहुविध पर्याय सहज उपलब्ध असल्याने आयटीआय हा करिअरचा चांगला पर्याय असल्याचे मत मान्यवरांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमात यशस्वी उद्योजक म्हणून अमोल संजय वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले. तर तंत्रप्रदर्शनात प्रतिक्षा महादेव दिवाणे, आदित्य संताजी वरकटे, आकाश गुजलवाड, शंभु गणेश मगर यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. तर चित्रकला स्पर्धेत राजकिरण गायकवाड, निशांत साबळे, मयुर रासकर, कमलेश पवार तसेच निबंध लेखन स्पर्धेत सुप्रिया नाथा सरखे, नेहा अरुण सव्वाशे, सुरज बाबु भोसले, रेणुका राज श्रेष्ठा यांना प्रशस्तीपत्रे देवून सन्मानित करण्यात आले. प्राचार्य एस. एल. गोसावी यांनी प्रास्ताविक केले, गटनिदेशक पी. यु. शिंदे यांनी सुत्रसंचालन केले, तर एस. एच. शिवले यांनी स्वागत केले व प्रणिता कळस्कर यांनी आभार मानले.