कृष्णलीला व महाभारताद्वारे धार्मिक, सामाजिक व नैतिक मूल्यांचा संदेश देत न्यू टाइम्स स्कूलमध्ये स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलनात वैविध्यपुर्ण उपक्रम

पुणे : न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूल, लोणीकंद (ता. हवेली) मध्ये धार्मिक, सामाजिक व नैतिक मूल्यांचा संदेश देत कृष्णलीला व महाभारताच्या अभिनव संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
श्रीरामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती रामचंद्र भूमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमप्रसंगी वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, श्री रामचंद्र ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सचिव पांडुरंग दत्तात्रय भूमकर, खजिनदार अथर्व मारुती भूमकर, संचालक गौरव मारुती भूमकर, श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे सहखजिनदार स्वप्निल दत्तात्रय भूमकर, लोणीकंदचे पोलिस उपनिरीक्षक स्वाती डोंबाळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाभारत या प्राचीन महाकाव्यातून धार्मिक, सामाजिक व नैतिक मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाभारतातील पात्रांचे रूपक धारण करून यातील प्रसंगांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केला. महाभारतातील श्रीकृष्ण, अर्जुन, कौरव, शकुनी, महारथी कर्णाचा पराक्रम, कुरुक्षेत्रावरील गीता उपदेश आणि पांडवांची विजयगाथा या प्रसंगांचे विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले. तसेच कृष्णावताराची कथा, बाललीलांतून प्रेम, मैत्री, करुणा आणि निस्वार्थतेचा संदेशही देण्यात आला.
यावेळी बोलताना वाघोली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी, आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग करीअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमातूनच यशाचे ध्येय गाठावे, असे सांगून येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचेही कौतुक केले. तर अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना, अध्यक्ष मारुती रामचंद्र भूमकर यांनी उद्याचा जबाबदार नागरीक बनताना विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार, तसेच जिद्द व चिकाटीतून प्रगती, हीच यशाची गुरुकील्ली असल्याचा मोलाचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या वैविध्यपुर्ण उपक्रमांसाठी न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रितिका नायडू यांनी प्रभावी नियोजन केले. तर श्रीमती सुभद्राबाई भुमकर जुनियर कॉलेजचे प्राचार्य दिलीप धंगेकर तसेच शिक्षक, कर्मचारी व पालक वर्गाच्या योग्य समन्वय व पाठबळातून हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.