आळंदीकडे जाणाऱ्या दिंड्यांचे भक्तिभावाने स्वागत करीत पेरणे येथे नागरिकांकडून अध्यात्मिक व धार्मिक संस्कृतीची जपणूक
आळंदीकडे जाणाऱ्या दिंड्यांचे पेरणेफाटा येथे अल्पोपहाराने स्वागत
पुणे : कार्तिकी एकादशीसाठी हाती भगव्या पताका व मुखी ज्ञानोबा – तुकारामचा जयघोष करीत आळंदीकडे जाणाऱ्या दिंड्यांचे भक्तिभावाने स्वागत करीत पेरणेफाटा येथील स्थानिकांकडून अध्यात्मिक व धार्मिक संस्कृती जपली जात आहे.
पेरणे, कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक, आपटी, डिंग्रजवाडी, वढु खुर्द तसेच लोणीकंद परिसरातील वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या सिध्देश्वर प्रासादिक दिंडी तसेच शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीतील वारकरी दरवर्षी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधीस्थळी हजेरी लावण्यासाठी जातात. पुणे-नगर रस्त्याने आळंदीकडे जाणाऱ्या या दिंड्यांचे पेरणेफाटा, वढु खुर्द, फुलगाव, तुळापूर या गावात स्वागत करण्यात येते.
पेरणे येथील सिध्देश्वर प्रासादिक दिंडीचे स्वागत पेरणेफाटा येथे ईश्वर शिंदे व सौ. शोभा ईश्वर शिंदे तसेच लक्ष्मी नगर लेन नं. ५ व मैत्री ग्रुपसह परिसरातील नागरीकांनी आज अल्पोहाराची व्यवस्था करीत मोठ्या उत्साहात केले. या दिंडीत विणेकरी हभप बबनराव वाळके, सरपंच सौ. उषा दशरथ वाळके, ग्रामपंचायत सदस्या सौ. माधुरी नवनाथ वाळके, माजी सरपंच मच्छिंद्र गुंडकर, नवनाथराव वाळके, विनायकराव वाळके, शिवाजीराव वाळके, दत्ताआबा वाळके, चिंतामण काेळपे, सत्यवान वारघडे, आदींसह ज्येष्ठ वारकऱ्यांचा सहभाग होता.
त्याचसोबत अहिल्यानगर येथील हिवरे झरे तसेच जामखेड येथील दिंड्यांचे अल्पोपहारासह स्वागत पेरणे येथील प्रा. गाेरक्षनाथ वाळके यांच्या परिवाराकडून करण्यात आले. विसावा व अल्पोहारानंतर ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल….’ असा जयघोष करीत या दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ झाल्या.