ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचाराची वाघोलीत जोरदार शक्ती प्रदर्शनाने सांगता
वाघोली परिसरासह लोणीकंद, बकोरी, केसनंद, कोलवडी, आव्हाळवाडी व भावडी परिसरामध्ये गावभेट दौरा
पुणे : महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचाराची सांगता सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या वाघोली येथे जोरदार शक्तीप्रदर्शनाने झाली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत असून आज सायंकाळी सार्वत्रिक प्रचाराचा समारोप झाला. शिरूर-हवेली मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून वेगवान प्रचार यंत्रणा राबवत मतदारांपर्यंत पाेहोचण्याचा प्रयत्न केला. शिरूर-हवेलीत गाव भेट दौऱ्यादरम्यान गावागावात त्यांचे जोरदार स्वागत करून मतदारांनी त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रचाराच्या आज अखेरच्या दिवशी कटके यांनी स्वत:चे गाव असलेल्या व सर्वाधिक मतदार संख्या असणाऱ्या वाघोली परिसरासह लोणीकंद, बकोरी, केसनंद, कोलवडी, आव्हाळवाडी व भावडी परिसरामध्ये गावभेट दौरा केला. तर दुपारी वाघोली येथे वाघेश्वर मंदिरापासून वाघोली गावठाण मार्गे केसनंद फाटा येथे कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शनाने प्रचाराची सांगता करण्यात आली. यावेळी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी तसेच वाघोलीतील अनेक मान्यवर पदाधिकारीही सहभागी झाले होते.