महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शंभुराजांच्या स्मारकांचे काम वेगाने होणार – ॲड.अशोक पवार
श्रीक्षेत्र तुळापूर येथे ॲड.पवार यांची छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन गावभेट दौऱ्यास सुरुवात
पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची बलिदानभुमी असलेल्या श्रीक्षेत्र तुळापूर तसेच वढू बुद्रुक येथे छत्रपती शंभुराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी तत्कालीन सरकारने ५३३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. मात्र त्यानंतर बदललेल्या सरकारने या निधीला आणलेला अडथळा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, उद्धवजी ठाकरे व राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दुर होईल व शंभुराजांच्या स्मारकांच्या कामाला नक्कीच गती येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड.अशोक रावसाहेब पवार यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या श्रीक्षेत्र तुळापूर येथे ॲड.पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तसेच श्री संगमेश्वर मंदिरात आरती करुन आजच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी कोपरा सभेत ॲड.अशोक पवार बोलत होते. या प्रसंगी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळापूर येथून प्रचारास सुरुवात केल्यानंतर दिवसभरात फुलगाव, वढु खुर्द, पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, सांगवी सांडस, शिंदेवाडी, हिंगणगाव, आष्टापुर येथे गावभेट व कोपरा सभा घेण्यात आला. दरम्यान पेरणे, वढु तसेच बुर्केगाव येथे आमदार अशोक पवार यांची बैलगाडी मधून मिरवणूक काढून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जागोजागी महिलाभगिनींकडून आमदार अशोक पवार यांना ओवाळण्यात आले. दिवसभराच्या या गावभेट प्रचार दौऱ्यात गावागावात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.