विकासकामांच्या माध्यमातून अविरत जनसेवा करीत राहणार – शिवाजीराव आढळराव पाटील
हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या २१ कोटी खर्चाच्या पुलाचे आढळराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
पुणे : पूर्वहवेलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजुर २१ कोटी खर्चाच्या हिंगणगाव – खामगाव टेक पुलामुळे परिसरातील २५ गावांतील दळणवळण तसेच विकासाला चालना मिळणार असल्याचा आनंद असून अशा विकासकामाच्या माध्यमातून यापुढेही अविरतपणे जनसेवा करीत राहणार असल्याची ग्वाही माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
पुर्वहवेली व दौंड तालुक्यातील अनेक गावांसाठी उपयुक्त असणाऱ्या व हिंगणगाव खामगाव टेक दरम्यान मुळा मुठा नदीवर होणाऱ्या २१ कोटी, ६८ लाख, ५५ हजार खर्चाच्या पुलाचे भूमिपूजन माजी खासदार तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद, भाजपा क्रिडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदिपआप्पा भोंडवे, यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाषआप्पा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी आढळराव पाटील पुढे म्हणाले, ‘या पुलाअभावी हिंगणगाव व खामगाव टेक परिसरातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय तसेच पुलासाठी विविध गावातील ग्रामपंचायतींच्या शिष्टमंडळांनी केलेला काैतुकास्पद पाठपुरावा लक्षात घेवून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुलाच्या मंजुरीसाठी आग्रह धरला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनीही तो मान्य करीत पुलासाठी तातडीने निधी मंजूर केल्याने पूर्वहवेलीतील २५ गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून विकासाचा वेगही वाढणार आहे.
दरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा कंद, भाजपा क्रिडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदिपआप्पा भोंडवे, यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाषआप्पा जगताप यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी या पुलामुळे परिसरात होणाऱ्या दळणवळण सुविधा तसेच विकासाबाबत मौलिक विचार व्यक्त करीत पुलबांधणीच्या या निर्णयाचे स्वागत केले.
हिंगणगाव येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, जिल्हा नियोजन सदस्य प्रवीण काळभोर, शिवसेना हवेली तालुका प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य वीज महावितरण समितीचे सदस्य विपुल शितोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शामराव गावडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शामराव माने, यशवंतचे संचालक कुंडलिक थोरात, सरपंच सागर थोरात, दशरथ वाळके, प्रवीण कोंडे, सागर शेलार, संदिप जगताप, मारुती थोरात, शांताराम पाबळे, दिपक लोणारी, शशिकांत चौधरी, विजय चौधरी, हिंगणगावचे सरपंच सागर थोरात, उपसरपंच रुपाली गायकवाड आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. काळूराम थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर हरिभाऊ शिंदे यांनी आभार मानले.
पुर्वभागातील नागरीकांच्या मागणीची दखल घेत म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या परिसराच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या हिंगणगाव-खामगाव टेक पुलासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भरीव निधी आणला. या पुलामुळे पुर्वहवेली तसेच दौंड तालुक्यातील अनेक गावांची दळणवळणाची मोठी सोय होणार असून पुर्वहवेलीच्या विकासाचे स्वप्नही साकार होणार आहे.
विपुल शितोळे, – शिवसेना हवेली तालुका प्रमुख, सदस्य, महावितरण समिती