खेळ व अभ्यासाचा योग्य समतोल ठेवल्यास उत्तम यश – वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड
हवेली तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत भूमकर महाविद्यालयाचे यश, एकूण २१५ संघाचा सहभाग
पुणे : खेळामुळे जीवनात सकारात्मकता येते तसेच खेळ व अभ्यासाचा योग्य समतोल ठेवल्यास उत्तम यश मिळवता येते, असे प्रतिपादन लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी केले.
लोणीकंद (ता. हवेली) येथे श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर ज्युनिअर महाविद्यालयामध्ये हवेली तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी हवेली तालुक्यातील २१५ संघानी सहभाग घेतला. यात मुलींचे ९३ तर मुलांच्या १२७ संघांतून एकूण २६४० खेळाडू सहभागी झाले. याही वर्षी महाविद्यालयाने उत्कृष्ट प्रकारे स्पर्धेचे आयोजन केले.
श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारुती रामचंद्र भूमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे खजिनदार पांडुरंग दत्तात्रय भूमकर, कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सुजाता राव, न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रितिका नायडू, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धंगेकर, महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ.सुषमा तायडे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण, स्पर्धा तसेच उच्च शिक्षणाच्या संधीमिळवून देण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. तर खेळात हारजीत होत असते, मात्र पराभवाची काळजी न करता उत्तम खेळाचे प्रदर्शन करा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती भुमकर यांनी अध्यक्ष भाषणात केले.
या स्पर्धेत श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षाखालील संघाला द्वितीय क्रमांक तर १७ वर्ष वयोगटाखालील मुलांच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. तसेच १९ वर्ष वयोगटात मुलींच्या संघानेही द्वितीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य, क्रीडाशिक्षकांनी अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक मोहन लोखंडे, महेश एलभार, हवेली तालुका क्रीडाध्यक्ष रोहिदास भाडळे तसेच महाविद्यालयाच्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. योजना गोडसे यांनी आभार मानले ……