लोणीकंद पोलीसांनी वेगवान कारवाई करीत गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळल्या
एन्जॉय ग्रुप टोळीकडून सात पिस्तुले व २३ जिवंत काडतुसे केली जप्त
पुणे : दहीहंडीचा कार्यक्रम संपवुन घरी येत असताना घराजवळच दबा धरुन बसलेल्या विरोधी एन्जॉय ग्रुप टोळीतील सदस्यांचा हल्ल्याचा डाव वेळीच लक्षात आल्याने फसला. मात्र लोणीकंद पोलिसांनी वेळीच ॲक्शन घेवून वेगवान कार्यवाही करीत एन्जॉय ग्रुप या गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळत मोठा मुद्देमाल जप्त केला. चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने सराईत गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले आरोपी, फिर्यादी व साक्षीदार यांच्या या केसमध्ये लोणीकंद पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत सात आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन देशी बनावटीची एकुण सात पिस्तुले व २३ जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने, सात मोबाईल फोन असा एकुण नऊ लाख १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्टला सासवड येथील दहीहंडीचा कार्यक्रम संपवुन फिर्यादी शेवाळे हे हडपसर, मांजरी मार्गे कोलवडी येथील घरी येत असताना त्यांचा विरोधक सुमित उत्तरेश्वर जाधव व इतर यांनी पुर्ववैमनस्यातुन कट रचून फिर्यादी व साक्षीदार यांना ठार मारण्यासाठी कोलवडी परिसरात सापळा लावला होता. मात्र याबाबत वेळीच कल्पना आल्याने फिर्यादीने हा डाव उधळवत याबाबत फिर्याद दिल्याने लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल करुन वेगात तपासाला सुरुवात केली. या दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या आदेशानुसार परिमंडळ ४ चे पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत सुचना दिल्या.
त्यानुसार लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे यांनी दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. तपासादरम्यान हा गुन्हा हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुप मधील सदस्यांनी केल्याचे समजताच पोलीस अंमलदार कैलास साळुंके, स्वप्नील जाधव, अजित फरांदे, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, अमोल ढोणे, दिपक कोकरे यांच्या पथकाने हडपसर भेकराईनगर परिसरात शोध सुरु केला. या गुन्ह्यात एन्जॉय ग्रुप मधील सदस्य शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमीत म्हस्कु अवचरे (वय २७), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (२६ वर्ष), लतिकेश गौतम पोळ (वय २२), रौफ ऊर्फ लाला बागवान (वय २३) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
या दरम्यान मिळालेल्या बातमीनुसार शहर पोलिसांनी शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप व सुमित उत्तरेश्वर जाधव याना मुंढवा परिसरात सापळा लावून ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडून अधिक माहिती घेत रविंद्र गोडसे व त्यांच्या पथकाने नवले ब्रिज कात्रज परिसरात सापळा लावून अमीत म्हस्कु अवचरे, अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, ऑकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव, लतिकेश गौतम पोळ, राज बसवराज स्वामी यांना शिताफीने ताब्यात घेतले. अधिक तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
यावेळी अमीत अवचरे व सागर हेगडे यांच्या ताब्यातुन देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या गुन्हयात अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने दिलेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान अधिक चौकशीत आरोपींकडुन देशी बनावटीची आणखी ०४ पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या सर्व तपासात सात आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुन देशी बनावटीची एकुण सात पिस्टल व एकुण २३ जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने, सात मोबाईल फोन असा एकुण नऊ लाख १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
—————-