वाघोलीकरांच्या नागरी समस्यांसाठी आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने आयोजित अनोख्या ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद
हजारो नागरीकांनी भर पावसात धावत, फलकांद्वारे वेधले वाघोलीच्या विविध नागरी समस्यांकडे लक्ष. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सरकारवर टिकास्त्र
पुणे : नगर रस्त्यावर नागरिकांना भेडसाणाऱ्या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी थेट आंदोलनाऐवजी मॅरेथॉनचा अनोखा फंडा वापरत आयोजित केलेल्या ‘रन फॉर वाघोली’ या उपक्रमाला भर पावसातही हजारो वाघोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. दरम्यान या उपरही शासनाने वाघोली येथील नागरी समस्या न सोडवल्यास ‘रन फॉर पीएमसी’ मॅरेथॉनद्वारे थेट महापालिकेवरच धडकण्याचा इशाराही यावेळी आमदार ॲड अशोक पवार यांनी दिला.
भर पावसातही धावले हजारो वाघोलीकर..
नगर रस्त्यावर वाघोली परिसरातील नागरीकांना भेडसावणाऱ्या पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, सांडपाणी समस्या आणि मालमत्ता कर यासह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने व रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ वाजता अभिषेक लॉन्स पासून सुरु झालेल्या या मॅरेथॉनचा लेक्सीकॉन स्कुलजवळ धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला. खासदार ओमराजे निंबाळकर तसेच आमदार अशोक पवार, सुजाता पवार व विविध मान्यवरांच्या सहभागामुळे स्पर्धकांचाही उत्साह द्विगुणित झाला. तर या स्पर्धेत ‘मी निष्ठावंत’ अशा मजकुराच्या बॅनर्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
सरकार गरिबाला अधिक गरीब व पैसेवाल्यांना अधिक पैसेवाले करीत आहे – ओमराजे निंबाळकर
“विमानतळाचाही कोणताही पुर्वअनुभव नसताना थेट विमानतळे अदानींच्या ताब्यात देणारे तर बांधकामाचाही अनुभव नसताना धारावी पुनर्वसनाचे काम अदानींना देणारे सरकार गरिबाला अधिक गरीब व पैसेवाल्यांना अधिक पैसेवाले करीत असल्याचा आरोप धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केला.
प्रशासनाने वाघोलीच्या समस्यांचे गांभीर्य ओळखावे अन्यथा ‘रन फॉर पीएमसी’ चे आयोजन करू- आमदार अशोक पवार
पाणी, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, भरमसाठ कर यासह विविध समस्यांनी ग्रासलेल्या वाघोलीच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘रन फॉर वाघोली मॅरेथॉनचे आयोजन केले. त्यात वाघोलीकर नागरीकांच्या उत्स्फुर्त सहभागातून प्रशासनाने याबाबतचे गांभीर्य वेळीच ओळखले पाहिजे, अन्यथा येत्या काळात ‘रन फॉर पीएमसी’ द्वारे वाघोलीतील नागरिक थेट महापालिकेवर धडकल्याशिवाय राहणार नाहीत, असाही इशारा यावेळी आमदार अशोक पवार यांनी दिला.
मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटांचा उत्फुर्त सहभाग
या मॅरेथॉनमध्ये १४ ते १८, १८ ते २४, २५ ते ४४, तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक अशा चार वयोगटांतील नागरीकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. सहभागींना ई-प्रमाणपत्रे, टी-शर्ट तसेच विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांकडून रुग्णवाहिकेसह संपूर्ण वैद्यकीय सहाय्य, लोणीकंद पोलीसांकडून चोख बंदोबस्त तसेच वाहतूक व्यवस्थेवरही विशेष लक्ष देण्यात आले. नगर रस्त्यावर झालेल्या या अनोख्या मॅरेथॉनमध्ये सहभागी हजारो नागरीकांनी भर पावसात वाघोलीतील विविध नागरी समस्यांच्या पाट्या हातात तसेच टि शर्टवर लावत सर्वांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर निधीअभावी रखडलेल्या नागरी समस्यांचा प्रतिकात्मक निषेध म्हणून सहभागी नागरीकांकडून संकलित एक रुपया महापालिकेला भेट म्हणून पाठवण्यात येणार आहे.
झुंबाच्या तालावर तरुणाईसोबत आमदार पवार व मान्यवरांचाही सहभाग
‘रन फॉर वाघोली मॅरेथॉनच्या निमित्ताने आयोजित झुंबा आणि अरबी परफॉर्मन्सलाही वाघोलीतील तरुणाईने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. भर पावसातही झुंबाच्या व गाण्यांच्या तालावर तरुणाईसोबत आमदार पवार, सुजाता पवार तसेच वाघोलीतील विविध मान्यवरही नृत्यात सहभागी झाल्याने तरुणाईचा उत्साह आणखी वाढला.
——————-