दर्जेदार रस्त्यांसाठी स्वत:चे काम समजून जनतेने लक्ष ठेवावे-आमदार अशोक पवार
पेरणे, येवले वस्ती येथे सुमारे ७ कोटी रुपये खर्चाच्या लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता तसेच डोंगरगाव ते वारघडे वस्ती बकोरी रस्त्याचे भुमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न
पुणे : काम हाच धर्म समजून विकासकामे केली पाहीजेत व स्थानिक जनतेनेही स्वत:चे काम समजून आपल्या रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष ठेवावे, असे आवाहन शिरुर-हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी केले.
पेरणे, येवले वस्ती येथे सुमारे ७ कोटी रुपये खर्चाच्या लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता तसेच डोंगरगाव ते वारघडे वस्ती बकोरी रस्त्याचे भुमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पवार बोलत होते.
यावेळी आमदार पवार यांनी पुर्वहवेलीत होणाऱ्या वाघोली ते पारगावपर्यंतच्या सुमारे ४०९ कोटींचा काँक्रीटचा रस्ता, नाशिक रेल्वे व रिंगरोडमुळे शेतकरी व स्थानिकांना होणारा फायदा, वढु-तुळापूर येथे शंभुराजांचे ४५० कोटींचे आंतरराष्ट्रीय दर्जांचे स्मारक, पुणे-शिरुर उड्डाणपुल अशा अनेक विकासकामांचा आढावा घेतला.
दरम्यान अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम व योजना राबवणारे आमदार अशोक पवार यांच्याच पुढाकाराने या रस्त्यांचे काम झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश युवक सरचिटणीस प्रदिप कंद व हवेली तालुकाध्यक्ष संदीप गोते यांनी सांगितले. तर बाजार समिती संचालक नानासाहेब आबनावे, दादापाटील वाळके, आण्णासाहेब टुले आदींनीही विकासकामांबद्दल विचार व्यक्त केले.
यावेळी महीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. शिवांजली गणेश पोटभरे, युवक अध्यक्ष जगदिश महाडीक, दादासाहेब माने साईनाथ वाळके, डॉ. गणेश पोटभरे, रमेश ढवळे, प्रिती कापरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दादासाहेब वाळके यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. शिवांजली गणेश पोटभरे यांनी आभार मानले.
या प्रसंगी हवेली तालुक्यातील पर्यटकांना काश्मीर येथे तत्परतेने मदत केल्याबद्दल आमदार अशोक पवार यांचा सत्कार खरेदी विक्री संघाचे संचालक दादासाहेब माने व संतोष कापरे यांच्याकडून करण्यात आला.