अष्टापूर – कोरेगाव मुळ दरम्यान मुळामुठा नदीवर होणार मोठा पूल
मोठा पूल व जोड रस्त्याच्या भूसंपादन कामासाठी सुमारे 32 कोटी रुपयांच्या निधीची शासनाकडून तरतूद
पुणे : अष्टापूर – कोरेगाव मुळ दरम्यान मुळामुठा नदीवरील बंधाऱ्याची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन प्रवासी व स्थानिक नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी मुळामुठा नदीवर मोठा पूल बांधण्याबाबतची मागणी शासनाने अखेर मान्य केली असून पुलाचे बांधकाम तसेच पोहोचमार्गाच्या भुसंपादनासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांची तरतुद शासनाने केली आहे.
पूर्व हवेलीत अष्टापूर-कोरेगाव मुळ दरम्यान मुळा-मुठा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्या वरून मोठ्या प्रमाणावर स्थानिकांची ये-जा तसेच लहान मोठ्या वाहनांची वाहतुक सुरु असते. मात्र या बंधार्यावरील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. सुरक्षा कठडे तर राहीलेच नाहीत उलट पुलावरील सुरक्षा कठड्याचे फाऊंडेशन ही उखडले आहे. तसेच पुलाच्या स्ट्रक्चरचे काँक्रीट निघून सळयाही उघड्या पडल्याने प्रवासी व स्थानिक नागरीकांना या अत्यंत अरुंद व धोकादायक रस्त्यावरून अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर या अरुंद पुलावरून वाहने थेट नदीत पडण्याचाही धोका आहे.
प्रवासी व स्थानिक नागरीकांची गैरसोय व धोकादायक प्रवास टाळण्यासाठी अष्टापूर-कोरेगाव मुळ दरम्यान मुळामुठा नदीवर मोठा पूल व्हावा, यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ.कल्पना सुभाष जगताप तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य व यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी पाठपुरावा करुन या मार्गाचे प्रमुख जिल्हा मार्गात रुपांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव करुन मंजुरी घेतली होती.
तसेच त्यानंतर या मोठ्या पुलासाठी निधीच्या मंजुरीसाठीही वेळोवेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद व आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केलेला होता. याची दखल घेत अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या पुलाच्या बाधंकामासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतुद करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेल्या होत्या. त्यानुसार पुलाचे बांधकाम तसेच पोहोचमार्गाच्या भुसंपादनासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांची तरतुद शासनाने केल्याने या पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार असून शिरुर – हवेलीत उरुळीकांचन, कोरेगाव मुळ, अष्टापूर, बिवरी, वाडेबोल्हाई, डोंगरगाव, पिंपरी सांडस, पेरणे या मार्गावरील वाहतुकही सुलभ व वेगवान होणार आहे.
अष्टापूर-कोरेगाव मुळ दरम्यान मुळामुठा नदीवर मोठ्या पूलाच्या मंजुरीमुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. मात्र येथील पुलामुळे वाढणाऱ्या वाहतुकीचा पुढेही वेळ वाचावा, याकरीता उरुळीकांचन येथे रेल्वेपुलही व्हावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद व यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केली आहे.
——————–