वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – मंत्री उदय सामंत
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न
पुणे : पुणे महानगरपालिकेत सामाविष्ट असलेल्या वाघोली गावातील समस्यांसंदर्भात शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पुढाकाराने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी संबंधित सर्वच विभागाला दिले दिले. तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उभारणाऱ्या खासगी बससाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचे व ड्रेनेजसाठी येत्या आठ दिवसात रस्त्यांचे रेखांकन करून जागा देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
वाघोली गावातील विविध मूलभूत सुविधांसंदर्भात शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर मुंबई येथे मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण, महावितरण पोलीस, पीएमपीएल आदींसह सर्वच विभागाचे वरीष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस, केंद्रीय निमा संस्थेचे प्रवक्ते डॉ.पवन सोनवणे, पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष व माजी सरपंच शिवदास उबाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व धानोरे सोसायटीचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर थेऊरकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध प्रश्नांवर चर्चा होवून कार्यवाहीच्या सुचना मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
यामध्ये वाघोलीमध्ये ड्रेनेज व्यवस्था करण्यासाठी रस्त्यांचे रेखांकन येत्या आठ दिवसांत करून देण्यात यावे. तसेच रस्ते, वाहनतळ संदर्भातील समस्यांसंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करावी. वाघोलीत रस्त्यांवरच खासगी बस थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या बसेसना रस्त्याशेजारील मोकळ्या जागेवर थांबविण्याची व्यवस्था करावी व त्यासंदर्भात पोलीस विभागाने पुढाकार घेवून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.