धर्मवीर संभाजी महाराजांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
हेलिकॉप्टरमधून होणार समाधिस्थळी पुष्पवृष्टी
पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त सोमवारी (ता. ८) श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे समाधिस्थळी पुजाभिषेक, किर्तन, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, धर्मसभा, पुरस्कार वितरण, रक्तदान शिबीर व महानाट्यासह विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती समाधिस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ग्रामपंचायत, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, ग्रामस्थ व धर्मवीर युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात यावर्षी महाराणा प्रतापसिंह महाराजांचे वंशज लक्ष्यराज सिंह महाराज यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रथेप्रमाणे रविवारी फाल्गुन वद्य चतुर्दशीला अखिल विश्व गायत्री परिवाराचे जिल्हाप्रमुख अँड.शिवाजीराव वाळके यांच्या पौरोहित्याखाली गायत्री महायज्ञही संपन्न होणार आहे.
तर पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर दिनी पहाटे धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज स्मृती समितीच्या वतीने श्रीशंभूछत्रपतींच्या समाधिची विधीवत महापूजा संपन्न होईल. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा होईल.
दरम्यान सकाळी शिवप्रतिष्ठानच्या वतीने मूक पदयात्रा होईल, त्यानंतर १० ते ११ या वेळात जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या उपस्थितीत हभप संग्रामबापू भंडारे यांचे ‘धर्मवीर शंभूछत्रपतींचे बलिदान’ या विषयावर किर्तन होईल. तर पुष्पवृष्टीपूर्वी समाधिस्थळी ह.भ.प. अशोक पवार यांच्या शौर्य पथकाची सशस्त्र मानवंदना आणि शासकीय मानवंदना हे कार्यक्रम होतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता वेद मंत्रांच्या जयघोषात उपस्थित शंभुभक्त तसेच हेलिकॉप्टरमधूनही पुष्पवृष्टी होईल. या निमित्त ‘देशभक्त कोष’चे चंद्रकांत शहासने यांच्या वतीने दोन हजार देशभक्तांंच्या चित्रांचे प्रदर्शनही शंभुभक्तांना पाहता येणार आहे.
सकाळी ११.४५ वाजता आयोजित धर्मसभेला महाराणा प्रतापसिंह महाराजांचे वंशज लक्ष्यराजसिंह महाराज, बजरंगदलाचे प्रमुख संयोजक शंकर गायकर तसेच अभिनेते राहुल सोलापूरकर व ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ‘छत्रपती संभाजी ‘या हिंदी चित्रपटाचे निर्माते राकेश दुलगज यांना लक्ष्यराजसिंह महाराजांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार तर धर्मवीर सेनेचे अक्षय महाराज भोसले, पत्रकार शरद पाबळे, लेखक निलेश भिसे, दत्ता बुट्टे आणि मित्र परिवार यांना शंभूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. धर्मवीर युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबीर होणार असून दिवसभर महाप्रसाद तसेच रात्री ‘इथे ओशाळला मृत्यु’ या नाट्यप्रयोगाचेही आयोजन करण्यात आल्याची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भंडारे, कार्यवाहक व पुण्याचे माजी नगरसेवक मिलींद एकबोटे, खजिनदार शांताराम भंडारे, स्मृती समितीच तज्ञ संचालक व धर्मवीर युवा मंचचे आधारस्तंभ सचिन भंडारे, धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष विनोद भंडारे, माजी अध्यक्ष अनिल भंडारे, तसेच ग्रामपंचायत सदस्य वैभव भंडारे, माजी सदस्य संजय भंडारे, समितीचे कायदेशीर सल्लागार ॲड.बाळासाहेब भंडारे आदींसह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.