समाजाच्या, देशाच्या कल्याणामध्ये भरीव योगदान देणारे उपक्रम उद्योजकांनी हाती घ्यावेत – प्रसिद्ध उद्योगपती संजय किर्लोस्कर यांचे आवाहन
डिसीसीआयएच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात किर्लोस्कर यांच्या हस्ते एपीपीएल इंडस्ट्रीजचे इंदेर जैन यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
उद्योजिका दिया गरवारे इबानेज, रिअर ॲडमिरल पुरुषोत्तम शर्मा यांचाही सन्मान
पुणे : ‘कोणत्याही क्षेत्रातील समृद्धीची संकल्पना ही आर्थिक नफ्यापेक्षा खूप पुढे आहे, हे लक्षात घेत काम करीत असताना गुणवत्ता, मूल्ये आणि शाश्वतता ही आपली मार्गदर्शक तत्त्वे असायला हवीत. उद्योग विश्वाचे सदस्य म्हणून समाजाच्या, देशाच्या कल्याणामध्ये भरीव योगदान देणारे उपक्रम उद्योजकांनी हाती घ्यावेत, असे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती आणि किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी केले.
डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर अर्थात डिसीसीआयए या उद्योजकांच्या संस्थेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. डिसीसीआयएचा २२ वा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच राजा बहादूर मिल रस्त्यावरील हॉटेल शेरेटन ग्रँड या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किर्लोस्कर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
याप्रसंगी डिसीसीआयएचे अध्यक्ष रथिन सिन्हा, उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तवा, सचिव व्ही. एल. मालू, खजिनदार प्रकाश धोका, कार्यकारी समितीचे सदस्य विभू प्रसाद आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतातील सर्वात मोठे पॉलिमर कम्पाऊंड निर्माता कंपनीचे संस्थापक संचालक असलेले इंदर जैन यांना यावेळी संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्काराने, तर उद्योजिका दिया गरवारे इबानेज यांना ‘सर्वोत्कृष्ट उद्योजिका’ पुरस्काराने तसेच रिअर ॲडमिरल पुरुषोत्तम शर्मा यांना ‘उत्कृष्ट सामाजिक सेवा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ॲडमिरल शर्मा यांनी ‘सुरक्षित भारत’ या आपल्या उपक्रमाद्वारे आजवर अनेक नागरिकांचे प्राण वाचविले असून तब्बल १० लाख नागरिकांना सुरक्षा विषयक प्रशिक्षण देखील दिले आहे.
यासोबतच संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट एच.आर. प्रॅक्टिसेस पुरस्कार यावर्षी विका इंन्स्ट्मेंटस प्रा.लि यांना तर बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस पुरस्कार आयटीसी लिमिटेड यांना प्रदान करण्यात आला.
उद्योग क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपली क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवायला शिका. तांत्रिक बाबींना जवळ करीत विकास साधा आणि यशाची परंपरा अशीच पुढे चालू ठेवा, असे सांगत संजय किर्लोस्कर म्हणाले, “नजीकच्या भविष्यात आपल्याला उत्पादकता, संपन्नता आणि स्थिरता यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सध्याच्या औद्योगिक क्षितीजामध्ये रोज नव्याने समोर येणारे स्टार्ट अप्स, जगाप्रमाणे बदलण्याची इच्छा आणि नवे काहीतरी शिकण्याची उर्मी, हे महत्त्वपूर्ण मालमत्ता म्हणून समोर येत असताना उद्योजकांनी नवे बदलानुसार प्रयोगशीलतेसह कौशल्य विकासावर भर देत जोखीम उचलण्याचीही मानसिक तयारी ठेवावी. असेही किर्लोस्कर यांनी सांगितले.
तर पुणे परिसरातील लघु व मध्यम उद्योजक, स्टार्ट अप्स यांसोबतच बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करुन त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डिसीसीआयए गेले अनेक वर्षे कार्यरत असल्याचे रथिन सिन्हा यांनी सांगितले.
तसेच देशाच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण अशा पुण्याच्या औद्योगिक पट्ट्यातील उद्योजकांचे, कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायमच कार्यरत असल्याची ग्वाही एच पी श्रीवास्तवा यांनी दिली. तसेच महाराष्ट्र शासनाने आणलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कायद्याच्याचे धोरण फायद्याचे असून या धोरणाने ठराविक वेळेत एक खिडकी योजनेद्वारे परवानग्या आणि लायसेंन्स मिळणे आणि व्यवसाय सुलभता येणे यामध्ये निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.देवीना राय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर व्ही एल मालू यांनी आभार मानले.