देशाबद्दलचा आदर व प्रगतीचा आलेख उंचावण्यास क्रिडा क्षेत्रातील यशाचे योगदान – भूमकर
श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तसेच आयईडीएसएसए यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे सणस मैदानावर आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
पुणे : ‘जगात कोणत्याही देशाबद्दलचा आदर तसेच प्रगतीचा आलेख उंचावण्यास त्या देशाच्या क्रिडा क्षेत्रातील यशाचेही मोठे योगदान असते, त्यामुळेच क्रिडा क्षेत्रातील प्रगतीसाठी देशात अनेक ठिकाणी क्रीडा विद्यापीठे तसेच आधुनिक साहित्य व क्रीडा मैदानेही उभारली जात आहेत. ’ असे प्रतिपादन श्रीरामचंद्र कॉलेज इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती रामचंद्र भूमकर यांनी व्यक्त केले.
लोणीकंद येथील श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तसेच महाराष्ट्र राज्य इंटर इंजिनियरींग डिप्लोमा स्टुडेन्टस स्पोर्टस असोसिएशन (आयईडीएसएसए) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे सणस मैदानावर आयोजित राज्यस्तरीय मुला – मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेचे उद्घाटन भूमकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेमध्ये १००, ४००, १५०० मीटर धावणे, रिले स्पर्धा, उंच उडी, लांब उडी, थाळी फेक, भाला फेक आदी खेळांमध्ये राज्यातील १४ जिल्ह्यांतील प्रमुख खेळाडूंनी सहभाग घेत विजय संपादन केला.
याप्रसंगी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना क्रिडा संचालिका डॉ.सुषमा तायडे म्हणाल्या, ‘खेळात जय, पराजयापेक्षाही खिलाडुवृत्ती जीवनात महत्वाची ठरते. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे व्यासपीठ हे राष्ट्रीय स्पर्धेचे प्रवेशद्वार असल्याने खेळाडुंनी उच्च ध्येय ठेवून खेळात उत्तुंग यश संपादन करावे.’
या स्पर्धेसाठी नाना ताकवणे व सहकाऱ्यांनी पंच म्हणून कामकाज पाहिले. प्रथम व द्वितीय क्रमांकांच्या विजयी खेळाडूंचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रीती डावरे तसेच मयुरा पांडे, अनिल जमदाडे, श्री. माळी, श्री. खेडेकर, श्री. गुणवरे आदींसह खेळाडू उपस्थित होते.
——————