केईएम हॉस्पिटलच्या वतीने वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे पर्यावरण जनजागृती रॅली
"हवामानातील बदल आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम" या विषयावर रॅलीद्वारे जनजागृती
पुणे : ग्रामीण आरोग्य कार्यक्रमात “हवामानातील बदल आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम” या विषयावर पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या वतीने करण्यात आले. पुणे फर्ग्युसन कॉलेजच्या प्रतिनिधी डॉ. रुपाली गायकवाड, पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. आशिष माने यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. रॅलीचा समारोप वढु बुद्रुक येथील श्रीछत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळावर झाला.
केईएमच्या व्हिएचआरपी आणि सीएचआरयु संशोधन युनिटचे विद्यार्थी, माहेर संस्था आणि शरदचंद्रजी पवार हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच विविध गावांतील पदाधिकाऱ्यांसह सुमारे २०० जणांनी यात सहभाग घेतला. व्हिएचआरपीचे विभागप्रमुख आनंद कवडे, सीएचआरयुचे विभागप्रमुख गिरीश दायमा यांच्यासह ज्येष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. धीरज अग्रवाल, डॉ. अदिती आपटे, डॉ. रुतुजा पाटील, प्रकल्प व्यवस्थापक राकेश पाटील आणि प्रशासन अधिकारी पांडुरंग जाधव यांनी रॅलीचे नेतृत्व केले.
श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावरील समारोप समारंभात डॉ.रुपाली गायकवाड, डॉ. आशिष माने, शरदचंद्र पवार शाळेचे प्राचार्य एकनाथ चव्हाण, वढु बुद्रुकचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हिरालाल तांबे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणकुमार गोंधळी यांनी “हवामान बदल आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सुरक्षित भविष्यासाठी व पर्यावरण रक्षणासाठी यादृष्टीने सामूहिक कृती महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच सध्याच्या हवामान बदलाच्या घटना, समुद्राची वाढती पातळी आणि पर्यावरणातील व्यत्यय यासारख्या विध्वंसक परिणामांवर प्रकाश टाकत हवामान बदलाच्या संकटाच्या तीव्रतेबद्दल गंभीरपणे विचार करण्याची तातडीची गरजही त्यांनी नमुद केली.
त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सक्रिय उपायांचा अवलंब करणे, शाश्वत पद्धतींचा पुरस्कार करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि पर्यावरणीय चेतना आणि शिक्षण वाढवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमुद केले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांद्वारे, आम्ही अधिक शाश्वत भविष्याकडे मार्ग तयार करू शकतो. असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. समारोपप्रसंगी व्हिएचरपीचे वरिष्ठ क्षेत्र संशोधन सहाय्यक विजय गायकवाड यांनी आभार मानले.