वाघोलीतील वाहतुक कोंडीवर उपाय म्हणून पर्यायी रस्त्यांसाठी आमदार ॲड. अशोक पवार यांचा पाठपुरावा, वाघोलीच्या नागरी हिताचे प्रश्न अधिवेशनात मांडणार
पुणे : पुणे – नगर रस्त्यावर वाघोली येथे सातत्याने होणारी प्रचंड वाहतुक कोंडी टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार ॲड. अशोक पवार यांनी वाघोलीला पर्यायी मार्गासाठी पुढाकार घेत खराडी रक्षकनगर ते आव्हाळवाडी व पुढे कटकेवाडीला जोडणाऱ्या रस्त्याचे मार्कीग पीएमआरडीए अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. यामुळे या ३० मीटर रुंदीच्या पर्यायी रस्त्याच्या कामास चालना मिळून वाघोली येथे सातत्याने होणाऱ्या प्रचंड वाहतुक कोंडीचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान वाघोलीतील वाहतुक कोंडी, ड्रेनेजसह नागरी हिताचे प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचेही ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.
वाघोली हद्दीत सव्हाना सोसायटी शेजारुन जाणाऱ्या व पुणे – नगर रस्त्याला पर्यायी मार्ग ठरणाऱ्या किमान ८०० मीटर लांबीच्या व ३० मीटर रुंदीच्या पर्यायी रस्त्याचे काम झाल्यास वाघोली येथे सातत्याने होणाऱ्या प्रचंड वाहतुक कोंडीतून नागरीकांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
या रस्त्याच्या मार्कींग प्रसंगी आमदार ॲड. अशोक पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब सातव, नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव, उद्योजक संग्राम जाधवराव, चाचा जाधवराव, कैलास सातव, सोसायटीचे श्री. केळकर, श्री. सुर्यवंशी, गुरुदीप सिंग तसेच मोजणीसाठी सहाय्यक नगररचनाकार शुभम वाकचौरे, अभियांत्रिकी विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वरूप शिरगुप्पे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्या बिल्डरांनी रस्ते तसेच आरक्षित जागांवर अतिक्रमण केले, तसेच परवानगीशिवाय फेरबदल केले, त्यांना कोणत्याही पूढील परवानग्या देऊ नयेत, तसेच बांधकामे पुर्ण होण्यापूर्वीच रस्ते होणे गरजेचे असून अमेनिटीच्या जागा तसेच ड्रेनेजच्या एसटीपी प्लॅंट साठीही जागा आरक्षित करा, अशी आग्रही मागणीही आमदार पवार यांनी पीएमआरडीए तसेच पालिका अधिकाऱ्यांकडे केल्या.
तर अनेक सोसायट्यांची एसटीपी प्लांट बंद असल्यामुळे उघड्यावर सोडले जाणारे डेनेजचे पाणी सर्वप्रथम बंद करून एसटीपी बंद असलेल्या सोसायट्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच ड्रेनेजच्या पाण्याचे शुद्धीकरण व पूनर्वापरासाठी एसटीपी प्लॅंटसाठी प्रभावी योजना राबवाव्यात, अशी मागणी रामकृष्ण सातव व बाळासाहेब सातव यांनी केली. तसेच सध्या डीपी रस्ता म्हणून नियोजित असलेल्या या रस्त्याची मोजणी पुर्ण होईपर्यंत या रस्त्यावर कोणत्याही बिल्डीग प्लॅनला मंजुरी देऊ नये, अशीही मागणी रामकृष्ण सातव तसेच श्री. जाधवराव यांनी केली.