श्रीक्षेत्र तुळापूरात शंभुराजांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होत आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेस सुरुवात
तुळापूरात दिसला ‘युवा संघर्ष यात्रे’चा उत्साह
पुणे : श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होत व त्रिवेणी संगमावर शंभू महादेवाला अभिषेक करुन युवकांचे प्रश्न सोडवण्यात यश मिळु दे, असे साकडे घालत कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या ‘युवा संघर्ष यात्रे’ला उत्साहात सुरुवात झाली.
‘युवा संघर्ष यात्रे’च्या तुळापूर येथील मुक्कामानंतर आज दुसऱ्या दिवशी पहाटे आमदार रोहित पवार यांनी पहाटे साडेपाच वाजताच त्रिवेणी संगमावर स्नान करून शंभू महादेवास अभिषेक केला. तसेच युवांसह समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडण्यासाठी युवा संघर्ष यात्रेला यश मिळू दे, अशी प्रार्थना शंभू महादेवाच्या चरणी केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहारही घातला, त्यानंतर समूहात राष्ट्रगीत झाल्यानंतर यात्रेचे श्रीक्षेत्र वढुकडे प्रस्थान झाले.
यावेळी त्यांच्यासमवेत शिरूर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार, राजेंद्र पवार, दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, प्रवक्ते विकास लवांडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, राज्यात केवळ युवांचेच प्रश्न नाहीत तर शेतकऱ्यांसह अनेक घटकांचेही विविध प्रश्न आहेत. हेच प्रश्न सोडवण्याचा युवा संघर्ष यात्रेचा उद्देश आहे. याच दरम्यान संघर्ष यात्रेच्या मार्गालगत काल दसऱ्याच्या दिवशीही भाव न मिळाल्याने अक्षरश: फेकून दिलेली फुले पाहून रोहित पवार व्यथित झाले.
हे चित्र बदलण्यासाठी व शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू पुसण्यासाठीच या युवा संघर्ष यात्रेचं आयोजन केल्याचे रोहीत पवार यांनी नमुद केले. दररोज साधारण १७ ते २२ किलोमीटर अंतर पुर्ण करुन ही पदयात्रा ४५ दिवसात नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे.आज दुपारी वढु, कोरेगाव भीमा व सायंकाळी सणसवाडी येथेच सभा व यात्रेचा मुक्काम आहे.