यशवंत सह.कारखाना सभासद संस्थांना प्रतिनिधींनीची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन
यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक
पुणे : चिंतामणीनगर, थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीच्या प्राथमिक मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कारखान्याच्या सभासद संस्थांनी त्यांच्या प्रतिनिधींची नावे येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत दाखल करावीत, असे आवाहन कारखान्याच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षांनी केले आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या १ ऑक्टोबर रोजी सभासद असलेल्या संस्थांचा समावेश मतदार यादीत करण्यात येणार आहे. सर्व संस्थांनी प्राथमिक यादीत नाव समाविष्ट करण्याबाबतचा ठराव करून त्यांच्या प्रतिनिधींचे नाव यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड थेऊर, (ता. हवेली) तथा प्रादेशिक उपसंचालक (साखर), साखर संकुल, पहिला मजला शिवाजीनगर पुणे यांच्या कार्यालयात २१ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत दाखल करावीत.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संस्था सभासदांच्या प्रतिनिधीचे नाव विहित मुदतीत प्राप्त झाल्यानंतर त्या नावाचा समावेश प्राथमिक मतदार यादीत करण्यात येईल. प्राथमिक मतदार यादीच्या हरकती, आक्षेपाबाबत जो कालावधी देण्यात येईल त्याची स्वतंत्र जाहीरात वृत्तपत्रात देण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या प्रतिनिधींचा समावेश प्राथमिक मतदार यादीत करण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.