कार्तिकी एकादशीसाठी आळंदीकडे जाणाऱ्या दिंड्यांचे कोरेगाव भीमा व पेरणेफाटा येथे स्वागत
कोरेगाव भीमा येथे फडतरे परिवाराकडून तर पेरणे फाटा येथे सरडे व मित्र परिवाराकडून अन्नप्रसादाने दिंड्यांचे स्वागत

पुणे : कार्तिकी एकादशीसाठी शिरुर, दौड तालुका तसेच अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विविध भागातील अनेक दिंड्या पुणे- अहिल्यानगर रस्त्याने तुळापुर फाटा येथून आळंदीकडे मार्गस्थ होत आहेत. हातात भगव्या पताका घेत टाळ, मृदुंगाच्या गजरात अभंगासह ज्ञानोबा – तुकाराम असा जयघोष करीत अनेक दिंड्या गेले दोन दिवस आळंदीकडे प्रस्थान करीत असल्याने पुणे-अहिल्यानगर रस्ता सध्या भक्तीमय झाला आहे.
टाळ, मृदुंगाच्या गजरात अभंगासह ‘ज्ञानोबा – तुकाराम’ असा जयघोष करीत पुणे-अहिल्यानगर महामार्गावर काल व आज दिवसभर पालखी सह अनेक दिंड्या आळंदीच्या दिशेने जात आहेत.

दरम्यान आळंदीकडे प्रस्थान करीत असलेल्या अनेक दिंड्यांचे कोरेगाव भीमा व पेरणेफाटा येथे स्थानिक भाविकांकडून चहापान, अल्पोपहार तसेच महाप्रसादाची पंगत देत मोठ्या भक्ती भावाने स्वागतही करण्यात आले. कोरेगाव भीमा येथे माजी सरपंच बाळासाहेब फडतरे यांच्या पुढाकाराने कांतीलाल फडतरे, नारायणराव फडतरे, शहाजी फडतरे, ग्रामपंचायत सदस्य केशवराव फडतरे, शांताराम फडतरे, तुळशीराम फडतरे, संजय फडतरे, ॲड.विकास फडतरे, रविंद्र फडतरे, अरविंद गव्हाणे आदींनी वांगदरी येथील श्री संत सेना महाराज पायी दिंडीला अन्नप्रसादाची पंगत देत दिंडीचे स्वागत केले.गेली ४५ वर्षे सलगपणे फडतरे परिवाराकडून या दिंडीचे स्वागत केले जात आहे.

तर पेरणेफाटा येथे श्रीक्षेत्र मांडवगण फराटा येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर दिंडीतील वारकऱ्यांसाठी अन्नप्रसादाचे आयोजन करून या दिंडी सोहळ्याचे यथोचित स्वागत करण्यात आले.उद्योजक हरिश्चंद्र सरडे, माजी उपसरपंच रेखा सरडे, डॉ.कोंडीबा सोनवणे, डॉ.राजश्री सोनवणे, फार्मासिस्ट दत्तात्रय फराटे, माजी चेअरमन सचिन शिवले, सर्जेराव येवले आदीं भाविकांनी यासाठी पुढाकार घेतला.दरम्यान दिवसभर आळंदी कडे जाणाऱ्या दिंडयामुळे काही काळ चौकात वाहतूक कोडींही झाली होती.
……..



