मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध-जिल्हाधिकारी-डॉ. सुहास दिवसे
निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ, फोटो काढून प्रसारीत केल्यास कठोर कारवाई
पुणे : मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले आहे.
मतदान केंद्रात आणि केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे. अनवधानाने आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे.
निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ, फोटो काढून प्रसारीत केल्यास कठोर कारवाई
निवडणूक कामकाजाची छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे, त्यांचे तसेच निवडणूक विषयक अफवा पसरविणारे संदेशाचे व्हॉटस्अॅप ग्रुप, समाजमाध्यमांवर प्रसारण करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिला आहे.