कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर, जाहिरातींवर छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो नसणं हा तमाम शंभुभक्तांच्या भावनांचा अपमान

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सोहळ्याला राजकीय इव्हेंट बनवल्याची टीका

पुणे – ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होतो आहे, त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभुभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे, अशा तीव्र शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या भूमिपूजन सोहळ्याचा राजकीय इव्हेंटवर टीका केली.

वढु बुद्रुक आणि तुळापूर येथील शौर्यतीर्थावर भूमिपूजन पार पडल्यानंतर तुळापूर येथे आयोजित जाहीर कार्यक्रमातून निघून जात खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, खरं तरं नगरला छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास उलगडून दाखविणारे ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे प्रयोग होत आहेत. जवळपास १ लाख लोकं हा प्रयोग याची देही याची डोळा अनुभवतात. त्यामुळे मला नगरला वेळेत पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे आपण कार्यक्रमातून निघून गेल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर निधी दिला म्हणजे विकास होतो, अशी कार्यक्रम आयोजित केला त्यांची समजूत झाली असेल. निधी दिला तर त्यातून इमारत उभी राहते, पण स्मारकाची प्रेरणा ही जिवंत चैतन्यातून मिळते, हेच चैतन्य जागविण्यासाठी आता अहमदनगरमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना गेली ३३४ वर्षे ही समाधी, हे स्मारक या ठिकाणी असल्याची आठवण करुन देताना काही लोकं १५ वर्षे या भागाचे खासदार होते. स्वतः अजितदादा साडेतेरा वर्ष पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास १५७ देशात पोहोचविण्यात खारीचा वाटा उचलू शकलो ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळेच २०१९ नंतर मी आणि आमदार अशोकबापू पवार यांनी सातत्याने या समाधी स्थळाचा विकास व्हावा यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू केला, त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन होत आहे, यासाठी मी मनापासून आभारी आहे. दुसरं म्हणजे कोनशिलेवर नाव नसलं तरी काळजावर कुणाचं नाव कोरलंय हे मायबाप जनता जाणते अशा शब्दांत कोनशिलेवरील नाव वगळण्याच्या प्रकाराचा समाचार घेतला.

गेल्या दोन दिवसांपासून हा भूमिपूजन सोहळ्याचा वाद रंगलेला होता. या वादात कार्यक्रम पत्रिका वारंवार बदलावी लागली. त्यामुळे काल रात्री उशिरा म्हणजे १०.४२ वाजता कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा विषय आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याने आपण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिलो असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा होता. त्यामुळे या भागाचे लोकप्रतिनिधी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांना बोलण्याची संधी मिळणं आवश्यक होतं. परंतु संपूर्ण कार्यक्रमाला राजकीय इव्हेंटचे स्वरुप दिल्यामुळे या दोघांनाही बोलण्याची संधी दिली नसल्याची चर्चा परिसरात रंगली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचविणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button