वाघोली परिसरासाठी कुंभार तलावात पाणी सोडा – जि.प.सदस्य ज्ञानेश्वर आबा कटके व माजी उपसरपंच समीर भाडळे यांची निवेदनाद्वारे महापालिकेकडे मागणी
वाघोलीच्या कुंभार तलावात पाणी सोडण्याबाबत महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्याकडे दिले मागणीचे निवेदन
पुणे : वाघोली शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना महापालिकेकडून मात्र या प्रश्नी दुर्लक्ष होत असून ग्रामपंचायत कालावधीत गावासाठी वरदान ठरणाऱ्या कुंभार तलावात वाघोली परिसरासाठी पाणी सोडावे, अशी मागणी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर आबा कटके व माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी निवेदनाद्वारे महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्याकडे केली आहे.
वाघोली गावाचा समावेश महापालिकेत झाल्याने पाणी पुरवठा करण्याची जबाबदारीही पालिकेची आहे. ही बाब लक्षात घेता वाघोली गाव परिसरासाठी कुंभार तलावात पाणी सोडण्याची सूचना संबंधीत विभागास करण्यात यावी, अशी मागणी पालिकेचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्याकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हा प्रमुख तथा जि.प.सदस्य ज्ञानेश्वर आबा कटके आणि माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी केली आहे.
वाघोली ग्रामपंचायत कालावधीत छत्रपती संभाजीनगर, बायफ रोड येथील कुंभार तलावात वढू येथील पाणी योजनेतील पंप हाऊस मधील ओव्हरफ्लोचे पाणी सोडले जात होते. त्यामुळे बायफ रोड, छत्रपती संभाजीनगर, आनंदनगर, नवनाथ नगर आदी परिसरातील कुपनलिकांना भरपूर पाणी उपलब्ध होत होते. परंतु, यावेळी पावसाळ्यात कुंभार तलावात पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सध्या पाणी टंचाईचा प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे.
वाघोली शहरातील पुणे- नगर रोडवरील पंप हाऊस मधील ओव्हरफ्लोचे पाणी सध्या वाघेश्वर तलावात सोडले जाते, त्याच पार्श्वभूमीवर बायफ रोड येथील कुंभार तलावात पाणी सोडले तर परिसरातील सर्व कुपनलिकांना नवसंजीवनी मिळेल, तसेच बाईफ रोड आर.एम.सी रोड वरील सर्व सोसायटी धारकांसह परिसरातील जवळपास १० ते १५ हजार नागरीकांचा पाण्याचाही प्रश्न सुटेल, त्यामुळे या निवेदनानुसार कुंभार तलावात पाणी सोडावे, अशी मागणी ज्ञानेश्वर आबा कटके आणि माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी केली असून महापालिका प्रशासनाकडे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.