श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा उत्सव शिरुर-हवेलीतही दिवाळीप्रमाणेच गावागावात मोठ्या उत्साहात साजरा
मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची सजावट, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
पुणे : श्रीक्षेत्र अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा उत्सव शिरुर-हवेलीतही दिवाळीप्रमाणेच गावागावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावागावात फ्लेक्स बॅनरसह रस्त्यांवर भगवे ध्वज, पताका, फटाक्यांची आतषबाजी असे उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. तर दिवसभरात पुजाभिषेक, होमहवनासह विविध धार्मिक कार्यक्रमही झाले.
लोणीकंद येथे भाजपचे शिरूर-हवेली विधानसभा प्रमुख व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिपदादा विद्याधर कंद यांच्या पुढाकाराने लोणीकंद येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळीच प्रदिप कंद यांनी पत्नी साै. पुजा कंद यांच्यासमवेत मंदीरात श्री राममुर्तीला पुजाभिषेक करुन होमहवनातही सहभाग घेतला. त्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा यासह धार्मिक मंत्र पठण झाले. दुपारी श्री राम महाआरती व भजन असे कार्यक्रम झाले. तर सायंकाळी फटाक्यांची आतषबाजीसह व फुलांची उधळणही करण्यात आली.
पेरणे गावामध्येही श्रीराम मंदिरात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. पेरणेगावासह पेरणेफाट्यावरही सकाळपासूनच रस्त्यांवर भगवे ध्वज, पताका, फटाक्यांची आतषबाजी असे उत्साहाचे वातावरण होते. तर अनेक युवकांनी भगव्या टाेप्या परिधान करीत आपल्या वाहनांनाही भगवे ध्वज लावले होते. सायंकाळी उत्साहात मिरवणुकही काढण्यात आली. तर गावात मंदिरात दर्शनासह महाप्रसादाने उत्सवाचा समारोप झाला.
या उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी कोरेगाव भीमा, पेरणे, लोणीकंद यांसह परिसरातील गावात मद्यविक्री व मांसाहारही बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले होते.
कोरेगाव भीमा गावातही हमरस्त्यासह सर्वत्र भगवे ध्वज, पताका लावल्यामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण होते. मंदिरांत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळ पासून मंदीरात पुजाभिषेक करण्यात आले, त्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सर्वत्र ‘जय श्रीराम’चा जयघोष ऐकायला मिळत होता.
सोशल मिडीयातही उत्सवाचे वातावरण…
दरम्यान श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा उत्साह सोशल मिडीयातही प्रतिबिंबीत होत होता. एकमेकांना डिजीटल शुभेद्छां संदेशाच्या क्लिप्ससह अयोध्येतील फोटो व्हीडीओचा सोशल मिडीयावर अक्षरश: पाऊस पडत होता.