बुर्केगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलगी गंभीर जखमी
वनविभागाने बिबट्याला त्वरित न पकडल्यास संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
पुणे : बुर्केगाव (ता. हवेली) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुनम दत्तात्रेय चोरे या मुलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान वेळोवेळी वनविभागाला कळवूनही वनविभागाने बिबट्याला न पकडल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रसंगी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गुरुवारी (ता. १४) सायंकाळच्या सुमारास बुर्केगाव हद्दीतील शिवारात झालेल्या या बिबट्याच्या हल्ल्यात मुलीच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सायंकाळी चौरे कुटुंब गावठाणाच्या शेजारी आपल्या शेतामध्ये भाजीपाला काढून पोत्यात भरत असताना मागे जवळच उभे असलेली मुलगी पुनम दत्तात्रय चौरे हिचा अचानक ओरडण्याचा आवाज आला. पुनमची आई, वडील तसेच शेतातील मजुरांनी धाव घेतली असता, बिबट्या पूनमला शेजारील उसात ओढत नेत असल्याचे निदर्शनास आले. सर्वांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या मुलीला सोडून उसात पळाला,
या हल्ल्यात पूनमच्या गळ्यावर, मानेवर, डोक्याला, तसेच पाठीला गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीच्या उपचारासाठी ससून रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. आजवर अनेक पाळीव जनावर हल्ला केलेल्या या बिबट्याने आता थेट लहान मुलीवरच हल्ला केला आहे. हल्ल्याच्या या घटनेने बुर्केगाव व परिसरात घबराट पसरली आहे.
बूर्केगाव आणि परिसरात अनेक दिवसापासून बिबट्यांचे वास्तव्य आहे. सात महिन्यापूर्वी एकनाथ थोरात या शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्याचवेळी गावकऱ्यांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही वन खात्याने त्यावर कुठलीही उपाययोजना केली नाही. दरम्यान वनविभागाच्या दुर्लक्षामुळेच हा छोट्या मुलीवर हल्ला झाल्याचे
ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर एका लहान मुलीवर एवढा मोठा प्राणघातक हल्ला होऊनही प्रशासन अवश्य कार्यवाही तसेच पुरेशी खबरदारीही घेत नाही, उलट आणखी एखादा हल्ला होण्याची वनविभाग वाट पाहत आहे का ? असाही प्रश्न ग्रामस्थ करीत आहे. या परिसरात वावरणाऱ्या अनेक बिबट्यांमुळे अजूनही पाळीव प्राणी तसेच मानवी हल्लेही होण्याची शक्यता आहे.
वेळोवेळी वनविभागाला कळवूनही वनविभागाने बिबट्याला न पकडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हल्ल्याची बाब गांभीर्याने घेऊन वेळीच त्यांचा बंदोबस्त केला नाही, तर सर्व नागरिक मिळून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पेरणे डोंगरगाव , बूर्केगाव , पिंपरी सांडस , न्हावी सांडस , सांगवी सांडस व परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागला दिला आहे.