अभिवादन कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी
शौर्यदिनानिमित् विजयस्तंभाला आकर्षक सजावट
अभिवादनासाठी रविवार पासूनच अनुयायी येण्यास सुरुवात
(कौस्तुभ शिंदे-विशेष प्रतिनिधी)
कोरेगाव भीमा, ता. ३१ : यावर्षी शौर्यदिनानिमित्त 31 तारखेला विजयस्तंभाची फुलांची सजावट पूर्ण करण्यात आली असून अभिवादनासाठी आजपासूनच अनुयायी येण्यास सुरुवात झाली आहे. आज रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर व इतर पदाधिकाऱ्यांनी विजय स्तंभाला अभिवादन करून सुविधांचा आढावा घेतला.
दरम्यान अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) व पेरणे (ता. हवेली) परिसरात येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत, याबाबतची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली असून यावर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांबरोबरच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुविधेकरिताही जिल्हा प्रशासनाने वाढीव संख्येने जय्यत तयारी केली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बार्टीचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी तयारीचा आढावा घेत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांना सूचनाही दिल्या आहेत.
विजयस्तंभाला फुलांची सजावट व रोषणाई :
विजयस्तंभावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रुप फोटो व अशोक चक्रासह सुमारे साडेचार टन वजनाच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून स्तंभासह परिसर व झाडांवर आकर्षक दिव्यांची रोषणाईही करण्यात आहे.
विजयस्तंभ परिसरात अभिवादनाचे योग्य नियोजन
अभिवादनासाठी विजयस्तंभाकडे येणाऱ्या अनुयायांसाठी यावर्षी येण्याचे तसेच बाहेर पडण्याचेही मार्ग वाढवण्यात आल्याने प्रशासनाने गर्दीचे योग्य नियोजन केले आहे.याबाबत प्रशासनाकडून ध्वनिक्षेपकावरून सातत्याने सूचना देण्यात येत आहे.
पुरेशा आरोग्य सुविधा :
येणाऱ्या अनुयायांच्या आरोग्यासाठी 29 ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून 20 फिरते बाईक आरोग्य पथक, 50 रुग्णवाहिका, 90 तज्ञ डॉक्टर्स व 200 आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. तसेच जवळच्या खाजगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह 100 खाटाही आरक्षित करण्यात आल्या आहे.
मुबलक पिण्याचे पाणी –
येणाऱ्या अनुयायांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाण्याकरिता १५० पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टँकर जवळ कागदी ग्लास व टँकरला नळ तोट्यासह मदतीला कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
हिरकणी कक्ष –
स्तनदा माता व महिलांसाठी पाच हिरकणी कक्षासह बालकांच्या मनोरंजना करिता खेळणी साहित्य व खाऊ पदार्थ तसेच मदतीसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. तर महिलांसाठी विजयस्तंभ परिसर, कोरगाव भीमा बाजारतळ, वफ्फबोर्ड व जाधवनगर वाहनतळ येथे चेंजींग रूम सुविधाही करण्यात आली आहे.
वाढीव शौचालय सुविधा –
अभिवादनासाठी येणारे अनुयायी तसेच बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांकरिता महिला व पुरुषांसाठी एकूण 2200 शौचालय उभारली आहे. तर पाण्यासाठी 40 पाण्याचे टँकर व 40 सक्शनमशीन तसेच 15 जेटींग मशीनही आहेत.
स्वच्छतेसाठी मोठी यंत्रणा :
विजयस्तंभ परिसर तसेच वाहनतळ व आरोग्यबुथ परिसरात स्वच्छते करिता 200 सफाई कामगार नियुक्त केले असून निर्जंतुकीकरण तसेच कचरा उचलणे या करिता एकूण 80 कचरा वाहतुक घंटागाड्याही उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. तसेच याच यंत्रणेकडून २ जानेवारीलाही या परिसरात स्वच्छता केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेकडून ४२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती
येणाऱ्या अनुयायांसाठी उपलब्ध सुविधांचे संनियंत्रण करुन सर्वोत्तम सेवा सुविधा देण्यासाठी हवेली तालुक्यात 280 अधिकारी कर्मचारी (40 पर्यवेक्षीय अधिकारी व 240 कर्मचारी) तर शिरुर तालुक्यात 141 अधिकारी कर्मचारी (21 पर्यवेक्षीय अधिकारी व 120 कर्मचाऱ्यांची) नियुक्ती केलेली आहे.
सर्वत्र दिशादर्शक फलक :
अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयांयाना विजयस्तंभ परिसरात वाहनतळासह उपलब्ध सोयी सुविधा कळाव्यात याकरिता पुणे व नगर बाजूकडे जागोजागी दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत.
ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून विजयस्तंभ परिसरात बार्टी संस्थेच्यावतीने पुस्तकांचे ३०० स्टॉल उभारले आहेत. बार्टी संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके ८५ टक्के सवलतीच्या दरात अनुयायांना वितरण करण्यात येणार आहेत.
सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
सोहळ्यास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सोहळा पाहता यावा यासाठी सह्याद्री वाहिनीवरून १ जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून कार्यक्रम तर सकाळी मान्यवरांचे अभिवादन
दरम्यान आज मध्यरात्री विजय स्तंभ परिसरात आतषबाजी तसेच सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात होईल. सकाळी ६.३० वाजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील. ७.३० वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली जाईल. सकाळी ९.३० वाजता ‘डॉ.बी.आर. आंबेडकर विज्डम बुकफेअर’चे उद्घाटन होईल, अशी माहिती बार्टीच्या वतीने देण्यात आली.
रविवारी रात्रीपासून नगर रस्त्यावर वाहनांना बंदी
- जिल्हा प्रशासनाने काल सायंकाळी पाच पासूनच वाहनांवर निर्बंध घालणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र गर्दीअभावी निर्बंध शिथिल केल्याने आज सायंकाळी पर्यंत नगर रस्त्यावर वाहतुक सुरू होती. रविवारी रात्रीनंतर नगर रस्त्यावर वाहनबंदी करण्यात आली..