धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज स्मारकाच्या कामासह युवकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करू : युवा संघर्ष यात्रे दरम्यान रोहित पवार यांचे वढू बुद्रुक ग्रामस्थांना आश्वासन
श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे ‘युवा संघर्ष यात्रेचे उत्साहात स्वागत
कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळी भव्य स्मारक उभारणीच्या कामासह युवकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही युवा संघर्ष यात्रे दरम्यान आमदार रोहित पवार यांनी दिली.
तुळापूर येथील मुक्कामानंतर बुधवारी दुपारी ‘युवा संघर्ष यात्रा श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे पोहोचली. यावेळी सजवलेल्या बैलगाडीतुन स्थानिकांनी त्यांना समाधिस्थळी आणले. समाधिस्थळी नतमस्तक होत व राजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार रोहित पवार यांनी ‘युवा संघर्ष यात्रे’त स्थानिकांशीही संवाद साधला.
यावेळी युवकांसह समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या युवा संघर्ष यात्रेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ वढु-तुळापुर या प्रेरणास्थळापासून होत असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच आमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून व शासनाकडून विकास आराखडा मंजूर झालेल्या शंभुराजांच्या स्मारकाचे प्रलंबित काम सुरू करण्यासाठी तसेच युवकांच्या रोजगारासह विविध घटकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही दिली. तर आमदार अशोक पवार यांनीही राजांच्या स्मारकासह स्थानिकांच्या पाण्याच्या प्रश्नांसाठीही पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्यासमवेत शिरूर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार, दिवंगत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रवीण गायकवाड, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, प्रवक्ते विकास लवांडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, सरपंच सारिका अंकुश शिवले, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळ, माजी उपसरपंच लाला तांबे, ग्रामपंचायत सदस्य पप्पु आरगडे व इतर ग्रामपंचायत सदस्य आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यात युवक व शेतकऱ्यांसह अनेक घटकांचेही विविध प्रश्न सोडवण्याचा युवा संघर्ष यात्रेचा उद्देश असल्याचे याप्रसंगी रोहित पवार यांनी सांगितले. वढु येथून कोरेगाव भीमाकडे जाताना शिवले कॉम्लेक्स येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.