सभापतीपदी निवडीनंतर प्रकाश जगताप यांचे मुळगावी अष्टापूरात जल्लोषात स्वागत
सहकार क्षेत्रात प्रकाश जगताप व सुभाष जगताप या बंधूंचे उत्तुंग यश


पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती प्रकाश जगताप यांचे मुळगावी अष्टापूरात ग्रामस्थ व कार्यकर्त्याकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी त्यांनी वाडेबोल्हाई येथे बोल्हाईमातेचेही दर्शन घेतले.
पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाची निवडणुक झाली. यात सभापतीपदी प्रकाश जगताप यांची निवड जाहीर होताच अष्टापूरात ग्रामस्थ व कार्यकर्त्याकडून जल्लोष करण्यात आला. दुपारी बाजारसमितीतून गावी परतताना वाडेबोल्हाई येथेही स्थानिक शेतकरी, कार्यकर्ते, ग्रामस्थांकडून त्यांचे हार, फुले व पेढे भरवून स्वागत करण्यात आले. तर सायंकाळी अष्टापूरात पाेहोचताच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्त्याकडून जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जगताप त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शनही घेतले.
अष्टापूरचे सुपूत्र असलेल्या प्रकाश जगताप हे पुन्हा एकदा पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी विराजमान झाले असून त्यांचे बंधु सुभाष जगताप हे यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्षपदी कार्यरत आहेत. तर सुभाष जगताप यांनी पंचायत समिती सदस्य तसेच त्यांच्या पत्नी सौ.कल्पना जगताप यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचाही कार्यभार सांभाळला आहे. एकुणच पुर्वहवेलीच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात मोठा नावलौकीक व योगदान असलेल्या या जगताप कुटूंबातून प्रकाश जगताप यांची पुन्हा एकदा सभापतीपदी निवड झाल्याने त्यांचे अष्टापूरात ग्रामस्थ व कार्यकर्त्याकडून मिरवणुक काढत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दरम्यान बिनविरोध निवडीबाबत विविध पदाधिकाऱ्यांसह सर्व घटकांचे आभार मानत जगताप यांनी बाजारसमिती व शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांसाठी दोन महत्वाचे प्रकल्प प्राधान्याने करायचे असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह शेतमालाला बाजारभावाच्या तुलनेत योग्य दर देणे तसेच शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या मुलांसाठी शेतकरी निवासात राहण्याची मोफत सोय करणार असल्याचेही त्यांनी नमुद केले.
——————–



