पेरणे येथे ३० वर्षापासून बंद असलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर महसूल प्रशासनाच्या कारवाईमुळे सुटला

पेरणे टोलनाक्यापासून गावाला जोडणारा दोन किलोमीटरचा रस्ता तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या आदेशानुसार अखेर पोलिस बंदाेबस्तात खुला

पुणे : पूर्व हवेलीत पेरणे येथे पुणे-अहिल्यानगर हमरस्त्यावर टोल नाक्यापासून पेरणे गावात पाचपीर देवस्थान पर्यंत जाण्यासाठी तसेच पेरणेफाटा येथील जयस्तंभाकडे जाणारा पर्यायी मार्ग असलेला सुमारे दोन किलोमीटर अंतराचा रस्ता खुला करण्यात महसुल प्रशासन व ग्रामस्थांना अखेर यश आले आहे. गेली ३० वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांसह एक जानेवारीला जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पर्यायी मार्गाने येणाऱ्या अनुयायांचीही मोठी सोय होणार आहे.

या रस्त्यातील अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना गावात ये-जा तसेच शेतीमालाची ने-आण करता येत नव्हती. त्यामुळे शेतमालाच्या नुकसानीसह शेतकरी बांधवांचीही गैरसोय होत होती. अनेक वर्षे प्रयत्न करुनही हा प्रश्न सुटलेला नव्हता. मात्र सर्व घटकांशी वारंवार चर्चेतून व विश्वासात घेवून हा प्रश्न सोडवण्यात ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व प्रशासनाला अखेर यश आले. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे महसुल प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तहसिलदार तृप्ती कोलते यांच्या आदेशानुसार सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यातील ४०० मीटर अंतरातील अतिक्रमणे पाेलिस बंदोबस्तात काढून हा रस्ता ग्रामस्थांसाठी खुला करण्यात आला.

तहसिलदार तृप्ती कोलते यांच्या आदेशाने झालेल्या या रस्ता खुला करण्याच्या धडक कार्यवाहीत मंडल अधिकारी संदीप झिंगाडे, तलाठी तलाठी संतोष इडोळे, ग्रामसेवक दादाभाऊ नाथ या अधिकाऱ्यांसह सरपंच सौ.उषा दशरथ वाळके, उपसरपंच सौ.अंकीता सरडे, माजी उपसरपंच अशोक कदम, सुजित वाळके, अक्षय वाळके, सदस्य दत्तात्रय ढेरंगे, माजी सदस्य साईनाथ वाळके, संजय वाळके आदी पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता. रस्ता खुला करण्याच्या कारवाईवेळी महसुल अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

दरम्यान बंद रस्त्याचा हा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देणे ही शासनाची भुमिका असल्याने अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या आदेशानुसारच मोजणीसह योग्य प्रक्रिया पार पाडून हा रस्ता खुला करून देण्यात आल्याचे मंडल अधिकारी संदीप झिंगाडे यांनी सांगितले.

तर वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला बंद रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासामुळे सर्वांच्या सहकार्याने केवळ अडीच-तीन वर्षांत सोडवता आला, याचे समाधान असल्याची भावना सरपंच सौ.उषा दशरथ वाळके व माजी उपसरपंच अक्षय ज्ञानेश्वर वाळके यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button